बैलजोडी अनुदान योजना - Bailjodi Anudan Yojana
ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना शेती कामासाठी बैलजोडी खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देणे. हा बैलजोडी अनुदान योजना सुरु करण्यामागेच मुख्य उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र कृषिप्रधान राज्य म्हणून ओळखला जातो. तसेच शेती हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मुख्य आणि पारंपरिक व्यवसाय आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढला आहे, तरीसुद्धा लहान आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आजही 'बैलजोडी' हा शेतीचा आधार आहे. डोंगराळ भाग, लहान जमिनीचे तुकडे यामध्ये बैलजोडीचा वापर अत्यंत सोयीस्कर आणि फायदेशीर ठरतो.
परंतु, गेल्या काही वर्षांत वाढलेली महागाई, चारा आणि पाणी टंचाई आणि नैसर्गिक आपत्तींमुळे बैलजोडी खरेदी करणे सामान्य शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नाही. या समस्येवर मात करण्यासाठी आणि लहान शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 'बैलजोडी अनुदान योजना' सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
बैलजोडी अनुदान योजनेअंतर्गत पशुपालक / शेतकऱ्यांना देशी बैल जोडी खरेदी करिता ५०% ते ७५% पर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाते
बैलजोडी अनुदान योजना सुरु करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट
- ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना शेती कामासाठी मदत करणे.
- शेतात नांगरणी, पेरणी, आणि मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःची बैलजोडी उपलब्ध करून देणे.
- शेतकऱ्यांना भाड्याने ट्रॅक्टर किंवा बैलजोडी आणण्याची गरज भासू नये.
- शेतीचा विकास करणे तसेच पारंपरिक शेतीला प्रोत्साहन देणे.
- शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे तसेच त्यांचा आर्थिक विकास करणे.
बैलजोडी अनुदान योजनेअंतर्गत लाभाचे स्वरूप
बैलजोडी खरेदी नंतर
- सर्वसाधारण प्रवर्ग: ५०% अनुदान (रु. ८४,०२७/-) तर उर्वरित रक्कम बँक कर्ज किंवा स्वतःचा हिस्सा म्हणून भरावी लागते.
- अनुसूचित जाती/जमाती: ७५% अनुदान (रु. १,२६,०४०/-) तर उर्वरित रक्कम बँक कर्ज किंवा स्वतःचा हिस्सा म्हणून भरावी लागते.
- अनुदान रक्कम: अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केली जाते.
बैलजोडी अनुदान योजनेचे लाभार्थी
सर्व प्रवर्गातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी, वनहक्क धारक, नोंदणीकृत ऊसतोड कामगार
बैलजोडी अनुदान योजना लाभार्थी निकष
सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
अ) भूमिहीन
ब) अत्यल्प भूधारक
क) अल्प भूधारक
ड) वनहक्क धारक
इ) महिला बचत गटातील लाभार्थी
वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के तसेच महिलांना ५० टक्के आरक्षण लागू राहील.
बैलजोडी अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा.
- शेतकरी अल्पभूधारक (१ ते २ हेक्टर) किंवा अत्यल्पभूधारक (१ हेक्टरपेक्षा कमी) जमिनीचा मालक असावा. मात्र वांहक धारकांना हि अट लागू राहणार नाही.
- अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ६० वर्षे असावे.
- अर्जदाराने मागील ३ ते ५ वर्षांत केंद्र अथवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेतून बैलजोडी किंवा ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान घेतलेले नसावे.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
देशी बैल जोडीची किंमत (पशुपालक/शेतकऱ्यांना देशी बैल जोडी खरेदी करिता अनुदान)
- पशुधन खरेदी: रु. १,५०,०००/-
- विमा १०.२०% (अधिक १८% GST): रु. १८,०५६/-
- एकूण: रु. १,६८,०५६/-
बैलजोडी अनुदान योजनेअंतर्गत अनुदानाचे स्वरूप
- सर्वसाधारण लाभार्थी: ५० टक्के
- अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील लाभार्थी: ७५ टक्के
बैलजोडी अनुदान योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- स्वतःच्या नावावर ७/१२ उतारा असलेला अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी.
- वनहक्क जमीन धारकांसाठी ७/१२ उताऱ्यावर "इतर अधिकार" मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची "जे" प्रमाणपत्र.
- ऊसतोड महामंडळाकडे नोंदणी असलेला ऊसतोड कामगार (फक्त भूमिहीन लाभार्थ्यांसाठी).
- दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र.
- बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रेशन कार्ड / वीज बिल / अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
- अद्ययावत ७/१२ उतारा, ८-अ उतारा आणि फेरफार पत्र.
- जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती किंवा मागासवर्गीय प्रवर्गातील अर्जदारांसाठी).
- बँक खात्याच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- सक्षम प्राधिकरणाने दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रतिज्ञापत्र.
- अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचे ४ फोटो
बैलजोडी अनुदान योजनेच्या अटी व शर्ती
- पात्र लाभार्थ्याने त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच एक महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्याने गठीत समिती समवेत देशी बैल जोडीची खरेदी करावी.
- एक महिन्याच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्याने त्याच्या पसंतीनुसार बाजारातून (कृषि उत्पन्न बाजार समितीमार्फत) देशी बैल जोडीची खरेदी करणे बंधनकारक राहील. जर लाभार्थ्याने उपरोक्त प्रमाणे विहीत केलेल्या कालमर्यादेत देशी बैल जोडीची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन, पुढील प्रतीक्षाधिन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल.
- खरेदी केलेल्या देशी बैल जोडीची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्याने अदा करावयाची आहे. तसेच, देशी बैल जोडीच्या खरेदीनंतर वाहतुकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्याने करावयाचा आहे.
- वाटप करण्यात येणाऱ्या देशी बैल जोडीचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने ३ वर्षांसाठी विमा उतरविण्यात यावा.
- योजनेमध्ये वाटप केलेलस बैल मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थ्यास दूसरा बैल खरेदी करुन पुरविण्यात यावे.
- तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्याचा खरेदी अहवाल (खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्यांचे बँकचे तपशील, विमा) जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांना सादर करावा.
- सदर अहवालानुसार जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी DBT द्वारे अनुदान हिस्सा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अदा करावा.
- योजनेअंतर्गत वाटप केलेल्या देशी बैलांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहे त्या संस्थेच्या संस्थाप्रमुखांनी करणे बंधनकारक राहील.
- योजनेच्या अटी/शर्तीची पुर्तता करुन अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्याकडून घेण्यात यावे.
बैलजोडी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
बैलजोडी अनुदान योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT (mahadbt.maharashtra.gov.in) अधिकृत पोर्टलला भेट द्या.
- 'शेतकरी योजना' (Farmer Schemes) या पर्यायावर क्लिक करून स्वतःची नोंदणी (Registration) करा.
- युझर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- 'पशुसंवर्धन योजना' किंवा 'कृषी अवजारे/पशू खरेदी' पर्याय निवडा.
- बैलजोडी अनुदानाच्या अर्जावर क्लिक करून सर्व वैयक्तिक व जमिनीची माहिती अचूक भरा.
- आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि अर्ज सबमिट (Submit) करा.
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
- आपल्या क्षेत्रातील पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (LDO) किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला किंवा तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाला भेट द्या.
- योजनेचा अर्ज प्राप्त करा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा आणि सोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडा.
- भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करून त्याची पोहोच पावती घ्या.
बैलजोडी अनुदान योजनेअंतर्गत निवड प्रक्रिया आणि अनुदान वाटप
- प्राप्त झालेल्या अर्जांची कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून छाननी केली जाते.
- निधी मर्यादित असल्यास आणि अर्ज जास्त आल्यास महाडीबीटी पोर्टलद्वारे संगणकीय सोडत काढली जाते. लाभार्थी क्रमाचा देखील विचार केला जातो.
- निवड झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती पत्र दिले जाते.
- पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्याने मान्यताप्राप्त गुरांच्या बाजारातून निरोगी बैलजोडी खरेदी करायची असते. पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून बैलांची आरोग्य तपासणी आणि टॅगिंग केले जाते.
- खरेदीचे बिल आणि तपासणी अहवाल सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात डिबीटीद्वारे जमा केली जाते.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
- शासनाचे 'पूर्वसंमती पत्र' मिळाल्याशिवाय बैलजोडी खरेदी करू नये, अन्यथा अनुदान मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा.आणि सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्जात खोटी माहिती भरू नका.
- अर्ज प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे, त्यामुळे कोणत्याही दलालाला किंवा मध्यस्थाला पैसे देऊ नयेत.
- खरेदी केलेल्या बैलजोडीचा पशुविमा घेणे फायदेशीर ठरते, जेणेकरून भविष्यात काही अनर्थ घडल्यास नुकसान भरपाई मिळू शकेल.