दुधाळ जनावरे वाटप योजना - Dudhal Janavar Yojana
महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि युवकांना स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' (Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakata Yojana) सुरू केली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाला महत्त्व प्राप्त झाले असून या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शेतीसोबत मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या दुधाळ जनावर गट वाटप योजना (Gai Mhais Gat Vatap Yojana) बद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती जसे की योजनेचे उद्दिष्ट, लाभाचे स्वरूप, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अटी आणि शर्ती, अर्ज कसा करावा, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
दुधाळ जनावर गट वाटप योजना सुरु करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट
पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या पशुपालना ऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्ध व्यवसायाला व्यावसायिक पातळीवर नेणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
दुधाळ जनावर गट वाटप योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केवळ जनावरेच नव्हे तर त्यांच्या संगोपनासाठी लागणारी पायाभूत सुविधा आणि साधनांचाही समावेश केला गेला आहे.
- जनावरांसाठी शेड निर्मिती, मिल्कींग मशीन, कडबाकुट्टी यंत्र, फॉगिंग सिस्टीम, सोलर पॅनेल आणि दुधाची भांडी यांसारख्या अत्याधुनिक साधनांसाठी देखील अनुदानातून मदत मिळते.
- अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या आधार-संलग्न बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) द्वारे दोन टप्प्यात जमा केली जाते. पहिला टप्पा शेड व साधनसामग्री खरेदी झाल्यावर आणि दुसरा टप्पा जनावरांची खरेदी पूर्ण झाल्यानंतर दिला जातो.
योजनेअंतर्गत लाभाचे स्वरूप
- लाभार्थांना 01 दुधाळ गाय/ म्हैस व 3 वर्षाचा विमा किंवा
- लाभार्थांना 02 दुधाळ गाय / म्हैस व 3 वर्षाचा विमा
योजनेचे लाभार्थी
सर्व प्रवर्गातील दारिद्रय रेषेखालील भुमीहीन, अल्पभुधारक, अत्यल्प भुधारक व महिला बचत गट
लाभार्थी निकष
सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
- भुमीहीन (फक्त १ गाय / म्हैस गटासाठी)
- अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत भूधारक)
- अल्प भूधारक (१ ते २ हेक्टरपर्यंत भूधारक)
- वनहक्क धारक
- महिला बचत गटातील लाभार्थी (1 ते 4 मधील)
वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के तसेच १ गाय / म्हैस गटासाठी महिलांना ५० टक्के आणि २ गाय / म्हैस गटासाठी ३० टक्के आरक्षण लागू राहील.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
- 1 गाय / म्हैस साठी जमीनधारणेची आवश्यकता नाही.
- 2 गायी/ म्हैस गटासाठी किमान 1 एकर इतकी जमीन आवश्यक. मात्र वनहक्क धारकांना ही अट लागू राहणार नाही.
- 2 गायी / म्हैस गटासाठी पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय / निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण ( अर्ज करतांना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापुर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील) किंवा 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव
- अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा ग्रामीण भागातील मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत शेतकरी), अल्प भूधारक (1 ते 1 हेक्टर), वनहक्क धारक आणि महिला बचत गटातील सदस्यांना प्राधान्य दिले जाते.
- पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचा किमान 2 वर्षाचा अनुभव अथवा शासकीय/निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे
- लाभार्थी निवड प्रक्रियेमध्ये महिलांसाठी 30% ते 50% पर्यंत आणि दिव्यांगांसाठी 5% आरक्षण लागू आहे.
गटाची किंमत
| गटाची किंमत | 1 गाय / म्हैस रु.1,00,000/- व विमा (रु 1,12,036/- रुपये) किंवा 2 गायी / म्हैस गट - 2,00,000/- रुपये व विमा (रु 2,24,072/-रुपये) |
|---|
अनुदानाचे स्वरूप
- सर्वसाधारण लाभार्थी 50 टक्के
- अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी - 75 टक्के
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला किंवा ग्रामपंचायतीचा दाखला
- स्वत: च्या नावे 7/12 उतारा किंवा किमान 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा
- वनहक्क जमीन धारकांसाठी 7/12 उताऱ्यावर “इतर अधिकार” मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसुची “जे” प्रमाणपत्र
- पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय / निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र (अर्ज करतांना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापुर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमी पत्र)
किंवा
स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र
किंवा
दुध संस्थेस किमान २ वर्ष दुध विक्री करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र - दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र
- बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी)
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल नंबर
- दुग्ध व्यवसाय अनुभवाचे प्रमाणपत्र
- बँकेचे पासबुक
अटी व शर्ती
- या योजनेमध्ये प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच एफ, जर्सी या संकरित गाई, प्रतिदिन ८ ते १० लिटर दुध उत्पादन देणाऱ्या गीर, सहीवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, प्रति दिन ५ ते ७ लिटर दुध उत्पादन देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गाई तसेच, मुऱ्हा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप करण्यात येतील. वाटप करावयाची दूधाळ जनावरे ही शक्यतो १-२ महिन्यांपूर्वी व्यालेली दुसऱ्या / तिसऱ्या वेतातील असावीत.
- पात्र लाभार्थ्याने त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच एक महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्याने गठीत समिती समवेत दुधाळ गाय / म्हैस गटाची राज्या बाहेरुन खरेदी करावी.
- जर लाभार्थ्यांने उपरोक्त प्रमाणे विहीत केलेल्या कालमर्यादेत जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतिक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येवून, पुढील प्रतिक्षाधिन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल.
- खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे. तसेच, दुधाळ जनावरांच्या खरेदीनंतर जनावरे वाहतूकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्याने करावयाचा आहे.
- वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांचा लाभार्थी व संबंधित जिल्हयाचे जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने ३ वर्षांसाठी विमा उतरविण्यात यावा.
- योजनेमध्ये वाटप केलेले जनावर मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थीस दूसरे दुधाळ जनावर खरेदी करुन पूरविण्यात यावे.
- तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्याचा खरेदी अहवाल (खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्यांचे बँकचे तपशील, विमा) जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांना सादर करावा.
- योजनेंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैदयकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहे त्या संस्थेच्या संस्थाप्रमुखानी करणे बंधनकारक राहील.
- योजनेच्या अटी/शर्तीची पुर्तता करुन अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्याकडुन घेण्यात यावे
दुधाळ जनावरे वाटप योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया
- सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत MahaDBT पोर्टलला भेट द्या.
- जर तुमची MahaDBT पोर्टलवर नोंदणी नसेल तर 'नवीन नोंदणी' (New Registration) वर क्लिक करून युजरनेम व पासवर्ड तयार करा.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर Username आणि Password टाकून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यावर 'पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग' या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' हा पर्याय निवडा.
- आता तुमच्यासमोर योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती, बँक तपशील, जमिनीची माहिती आणि प्रकल्पाचा तपशील अचूक भरा.
- सर्व माहिती भरून झाल्यावर आवश्यक ती सर्व कागदपत्रे (स्कॅन करून) ठरलेल्या साइजमध्ये अपलोड करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून स्वतःकडे सुरक्षित ठेवा.
लक्षात ठेवा
- अंतिम दिनांकापूर्वी अर्ज करा कारण अंतिम तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जात नाही. तसेच अर्ज स्वीकारला देखील जात नाही.
- अर्ज करण्यापूर्वी तुमच्याजवळ सर्व कागदपत्रे असल्याची खात्री करा.
- एका वेळी एकदाच अर्ज करा.
- अर्जात खोटी तसेच दिशाभूल केली जाणारी माहिती भरू नका.
- अर्ज करण्यापूर्वी तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असल्याची खात्री करा. जेणेकरून अनुदानाचे पैसे जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
- अर्ज करताना काही अडचणी आल्यास किंवा योजनेच्या अधिक माहितीसाठी जवळच्या पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती किंवा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.