ई पीक पाहणी २०२६ शासन निर्णय - नवीन बदल


राज्यामध्ये अँग्रिस्टॅक (AgriStack) योजना राबविण्याच्या अनुषंगाने डिजिटल क्रॉप सर्व्हेसह इतर घटकांच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली होती.. केंद्र शासनाच्या 'Digital Agriculture Mission' अंतर्गत 'Central Digital Crop Survey (DCS MH)' ही प्रणाली अधिक पारदर्शक, अचूक व तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीशी सुसंगतता राखण्यासाठी महसूल व वन विभागाने 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या नियम, १९७१' मधील नियम २९ व ३० मध्ये कायदेशीर सुधारणा केली आहे.


e pik pahani 2026

तसेच जमाबंदी आयुक्त, पुणे यांनी पीक पाहणी नोंदणीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन दिनांक १४ ऑक्टोबर, २०२४ च्या शासन निर्णयातील हंगामी पिकांच्या माहिती संचाच्या (DCS) कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


हंगामी पिकांचा माहिती संच (Seasonal Crops Registry) कार्यपद्धती मधील तरतुदी ऐवजी खालील प्रमाणे सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात येत आहे.


डिजिटल पीक सर्वेक्षण (DCS MH) कार्यपद्धती

पीक पाहणी नोंदवण्याची कार्यपद्धती

  1. हंगामाच्या पहिल्या दिवसापासून 'पीक पाहणी सहायकामार्फत' पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाईल. पीक पाहणी सहायकाची नोंदणी आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTP प्रमाणीकरणाद्वारे करण्यात येईल. तसेच, संबंधित मोबाईल उपकरणाचे IMEI Binding करण्यात येईल.
  2. प्रत्येक गावात शेतकऱ्याच्या अनेक शेत जमिनी असतात व त्या शेत जमिनीमध्ये शेतकरी विविध पिकांची लागवड करत असतो. शेतकऱ्याने त्याच्या एका शेतात लावलेली विविध पिके नोंदणी करतील त्या शेत जमिनीस "ओनर्स प्लॉट" म्हणण्यात येईल. म्हणजेच शेतकऱ्याचे एका ठिकाणी असलेले जमिनीचे क्षेत्र म्हणजे त्या शेतकऱ्याची एक शेत जमीन याला "ओनर्स प्लॉट" म्हणण्यात येईल.
  3. हंगामी पिकांचा माहिती संच निर्मिती करताना करावयाची पीक पाहणी ही ओनर्स प्लॉट प्रमाणे करावयची आहे.
  4. १००% पीक पाहणी ही सहायकाद्वारे करून घेणे ही ग्राम महसूल अधिकारी यांची जबाबदारी असेल.
  5. १००% ओनर्स प्लॉट ची पीक पाहणी ही गटाच्या बांधापासून २० मीटर च्या आतमध्ये जाऊन करावी.

सहायक नेमणूक करण्यासाठी तहसीलदार स्तरावरील कार्यपद्धती

  1. तहसिलदार प्रत्येक १००० - १५०० ओनर्स प्लॉटसाठी पुढीलपैकी नमूद केलेल्या जसे की, कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान कर्मचारी (M.S.R.L.M), CSC चालक व ग्रामस्तरीय मानधन तत्वावर कार्यरत इतर विभागांचे कर्मचारी, मानधन तत्वावर काम करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्यास MyBharat पोर्टल वर नोंदणीकृत नेहरू युवा स्वयंसेवक इ. पैकी एकाची नेमणूक ही सहायक म्हणून करतील.
  2. जास्तीत जास्त १५०० ओनर्स प्लॉट करिता एक सहायक या प्रमाणे सहायकाची नियुक्ती करण्यात येईल.
  3. प्रत्येक गावासाठी एका स्वतंत्र पीक पाहणी सहायकाची नेमणूक करण्यात यावी. एका पीक पाहणी सहायकाकडे जास्तीत जास्त १५०० ओनर्स प्लॉटची जबाबदारी देण्यात यावी. ज्या गावांमध्ये १५०० पेक्षा कमी ओनर्स प्लॉट उपलब्ध असतील, अशा गावांसाठी देखील स्वतंत्र पीक पाहणी सहायकाची नेमणूक करण्यात यावी.
  4. कमी ओनर्स प्लॉट असणाऱ्या गावांचे एकत्रीकरण करून २ किंवा त्यापेक्षा जास्त गावे एका सहायकास नेमून देण्यात येतील. परंतु ओनर्स प्लॉट ची संख्या १५०० पेक्षा जास्त नसावी.
  5. ज्या गावांमध्ये १५०० पेक्षा जास्त ओनर्स प्लॉट आहेत त्या गावांमध्ये १ पेक्षा अधिक सहायकांची नेमणूक करता येईल.
  6. कोणत्याही परिस्थितीमध्ये एका सहायकाकडे १५०० ओनर्स प्लॉट पेक्षा जास्त ओनर्स प्लॉटचे कामकाज देता येणार नाही.
  7. पीक पाहणी सहायकांची नेमणूक ही केंद्र शासनाच्या वेब पोर्टल वरून ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसिलदार हे त्यांच्या लॉगिन मधून करतील.

सहायकाची जबाबदारी

  1. हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहायकामार्फत पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू करतील.
  2. गावातील १००% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी ही केवळ सहायक यांनी करावयाची आहे.
  3. सहायक स्तरावरून नोंदविण्यात आलेल्या नोंदीची १००% पडताळणी ग्राम महसूल अधिकारी यांचेमार्फत करण्यात येईल.
  4. सहायक स्तरावरून नोंद केलेल्या आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी मान्याता दिल्यानंतर गाव नमुना-१२ वर प्रतिबिंबित करण्यात आलेल्या पीक नोंदणी मध्ये काही दुरुती असल्यास शेतकरी मंडळ अधिकारी यांना अर्जाद्वारे कळवतील आणि मंडळ अधिकारी तात्काळ स्थळ पंचनामा करून ती पीक नोंदणी मोबाईल app द्वारे दुरुस्त करतील.
  5. सहायक स्तरावरून नोंद करण्यात आलेली ई - पीक पाहणी ग्राम महसूल अधिकारी यांनी नामंजूर केली असता पुनः सहायकांना मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन पीक नोंदणीसाठी उपलब्ध होईल.
  6. मंडळ अधिकारी मोबाईल अॅपद्वारे व्हेरिफायर म्हणून लॉगिन करतील. ग्राम महसूल अधिकारी यांनी दोनदा नाकारलेल्या सर्व पीक नोंदीची पडताळणी करून मंडळ अधिकारी स्वतः मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदी करतील.

सहायक मानधन

सहायक यांना ओनर्स प्लॉट निहाय हंगाम निहाय प्रति ओनर्स प्लॉट रु.१०/- निर्भेळ पिकासाठी आणि रु १२/- मिश्र पिकासाठी मानधन देण्यात येईल. सहायक यांचे मानधन सहायक यांनी दिलेल्या बँक खात्यामध्ये महसूल विभागाकडून online पद्धतीने वर्ग करण्यासाठी कृषि विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना SNA SPARSH प्रणालीद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात येईल.